यूपीएससी च्या अभ्यासक्रमात बदल...
केंद्रीय लोकसेवा आयोग तथा 'यूपीएससी'च्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रम नव्याने बदलण्यात आला आहे. 'यूपीएससी'च्या मुख्य परीक्षेत (मेन्स) यावर्षीपासून दोनऐवजी एकच वैकल्पिक विषय असणार आहे. तसेच, पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करून पूर्वपरीक्षा एक आठवड्याने पुढे ढकलण्यात आली आहे.आता पूर्वपरीक्षा १९ मे ऐवजी २६ मे रोजी होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने या बदलांबाबत संकेतस्थळावर अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. मुख्य परीक्षेचे एकूण गुण २२५ ने कमी करण्यात आले असून, आता २०७५ एवढे एकूण गुण असतील. पूर्वी दोन वैकल्पिक विषयांचे प्रत्येकी दोन पेपर आणि सामान्य ज्ञानाचे दोन पेपर असे (प्रत्येकी ३०० गुणांचे) एकूण सहा पेपर असत. त्यापैकी एक वैकल्पिक विषयाचे दोन पेपर कमी करण्यात आले. नव्या अभ्यासक्रमात आता नीतिमूल्ये, एकात्मता व अभिक्षमता (अॅप्टिट्यूड), सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन, जैवविविधता, पर्यावरण, तंत्रज्ञान व आर्थिक विकास या वाढीव उपघटकांचा समावेश करण्यात आला आहे. आता एकच वैकल्पिक विषय निवडता येणार आहे. सामान्य अध्ययन पेपर-एकमध्ये दोन विभाग करण्यात आले आहेत.