मोबाईल हॅण्डसेट आणि टॉवरमधून प्रसारित होणारा किरणोत्सर्ग कमी करण्यासाठी सरकारने नव्या सूचना लागू केल्या आहेत.
मोबाईल वापराबाबत कठोर सरकारी धोरण आजपासून लागू करण्यात आलं आहे. या सूचनांचं पालन करूनच मोबाईलचा वापर करावा असं आवाहन सरकारने केलं...
आहे.
या सुचनांची अमलबजावणी शनिवारपासूनच व्हावी, यासाठी केंद्र सरकार आग्रही आहे. मात्र या सूचनांवर नजर टाकली तर त्या खरोखरच करता येतील का? हा प्रश्न आहे.
सरकारने जारी केलेल्या सूचनांमध्ये पुढील निर्देश देण्यात आले आहेत.
१) मोबाईलवर कमीत कमी बोला
२) बोलताना मोबाईल फोन कानापासून शक्य तेवढा दूर ठेवावा
३) बोलण्यासाठी शक्यतो हेडफोन किंवा ब्लूटूथचा वापर करावा
४) मोबाईलवरील स्पीकर सुविधेचा जास्तीत जास्त वापर करा
५) रेंज मिळत नसल्यास बोलणे टाळा, कारण रेंज नसलेल्या ठिकणी मोबाईल जास्त ताकदीने कार्यरत होतो, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम शरिरावर होतो
६) शक्य असल्यास बोलण्यापेक्षा एसएमएसचा वापर करा
७) बोलताना मोबाईलचा कानावर दबाव पडणार नाही याची काळजी घ्या. खांदा आणि कान यामध्ये मोबाईल ठेवून बोलणे टाळा. बाईकवरून चालवताना किंवा बाईकवरून जाताना मोबाईल वापरू नका
८) हेलमेट असताना किंवा केस ओले असताना अथवा आंघोळ केल्या केल्या मोबाईलवर बोलणे टाळा. तसंच मेटल फोनचा चष्मा असलेल्यांनी मोबाईलवर बोलू नये. मेटल आणि पाणी हे रेडिओ लहरींचा सुवाहक आहे.
९) फोन कनेक्ट झाल्यावरच तो कानाला लावा. कारण मोबाईल, कॉल कनेक्ट करण्यासाठी हाय पॉवर घेतो.
१०) शक्य असल्यास मोबाईलऐवजी लॅण्डलाईनचा वापर करा
११) कृत्रिम अवयव प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांनी मोबाईल दूर ठेवा
१२) लहान मुलांपासून मोबाईल दूर ठेवा
अशा प्रकारच्या सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत.
सरकारच्या या सूचनांचं पालन करणं जिकीरीचंच आहे. मात्र, या सूचनांचा अंमल केल्यास आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरतील असा सरकारचा दावा आहे.
मोबाईलमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गची मर्यादा, २ वॅटवरून १.६ वॅट करण्यात आली आहे. त्यामुळेही मोबाईल आता पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षित मानण्यात येत आहे. तसंच त्यामुळे आरोग्यावर होणारा दुष्परिणाम कमी होईल, असा विश्वासही वर्तवण्यात येत आहे.
याशिवाया मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गाच्या प्रमाणातही सरकारने एक दशांशने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मोबाईल टॉवर उभारण्यासाठीही नव्याने निर्देश दिले आहेत.
या नव्या निर्देशानुसार मोबाईल कंपन्यांवरही काही बंधन घालण्यात आली आहेत. यामध्ये त्यांना मोबाईलची एसएआर मूल्याची माहिती देणं, तसंच हॅण्टसेटसोबत एक बुकलेट देणं बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे.